![]() |
| बुलढाणा जिल्हा पोलिस दलातर्फे "फिट इंडिया सायक्लोथॉन 2025" उत्साहात पार |
बुलढाणा, दि. 24 ऑगस्ट – बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित फिट इंडिया सायक्लोथॉन 2025 स्पर्धा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. राहुल एन. रोकडे व जिल्हाधिकारी मा. डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणातून सुरू झालेली सायकल स्पर्धा धाड नाका, कोलवड मार्गे शहरातील विविध चौक पार करत पुन्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे समारोपास आली.
या उपक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. राहुल एन. रोकडे, जिल्हाधिकारी मा. डॉ. किरण पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मा. श्री. पराग नवलकर तसेच पोलिस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वतः सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात पोलिस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी "नशामुक्त बुलढाणा" या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मिशन परिवर्तन या उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम व क्रीडा अंगीकारावेत, असे आवाहन करत उपस्थितांना फिटनेस शपथ दिली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनीही नशामुक्ती व आरोग्यदायी जीवनशैलीसाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
स्पर्धेत पुरुष गटात सुरज पवार यांनी प्रथम, अॅड. शरद राखोंडे यांनी द्वितीय तर रणजित व्यवहारे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. महिला गटात डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मृणाल पडोळसे द्वितीय तर विद्या सानप तृतीय क्रमांकावर राहिल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत विशेष सहभागासाठी संजयजी मयुरे (वय 70), अॅड. शरद राखोंडे (आर्यन मॅन) तसेच बालस्पर्धक सिद्धी सोनोने (वय 9 वर्षे) यांचा देखील सत्कार करण्यात आला. या वेळी “भारत माता की जय” व “देखना है कल, तो चलाओ सायकल” अशा घोषणा देत वातावरण उत्साहपूर्ण बनले होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पो.नि. श्री. सुनील अंबूलकर यांनी केले. या प्रसंगी अपर पोलिस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुधीर पाटील, राखीव पोलिस निरीक्षक श्री. विकास तिडके, विविध पोलिस अधिकारी व अंमलदार, पत्रकार तसेच शहरातील नागरिक व सायकलस्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





