मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ |
मुंबई, 31 ऑगस्ट –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी केवळ आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी होती, मात्र परिस्थिती पाहता आता आणखी एका दिवसासाठी आंदोलन सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, “मराठा समाजाचा प्रश्न चर्चेतून, कोणालाही नाराज न करता आणि न्यायालयात टिकेल अशा पद्धतीनं सोडवला जाईल.” यासाठी सरकारनं मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन केली असून, ती समिती आंदोलकांशी चर्चा करून अहवाल सादर करेल. तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं वर्तन आंदोलनाला गालबोट लावणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
आज सकाळपासून जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले असून, त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून हजारो आंदोलनकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. फोर्ट, सीएसएमटी, चर्चगेट, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पूर्व मुक्त महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत.
मोठी गर्दी वाढत असल्याचं लक्षात घेऊन जरांगे यांनी आंदोलकांना आवाहन केलं की, “मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या. पोलिसांना सहकार्य करा आणि निर्धारित ठिकाणीच वाहनं उभी करा.” तरीदेखील आझाद मैदान परिसरात आंदोलकांची प्रचंड उपस्थिती कायम आहे.