मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरप्रकार : पुणे जिल्हा परिषदेतील ५४ महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता |
पुणे, 31 ऑगस्ट –
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरप्रकार समोर आला आहे. पुणे जिल्हा परिषदेतील तब्बल ५४ महिला कर्मचाऱ्यांनी स्वतः शासकीय सेवेत असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महिला व बालकल्याण विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर उर्वरित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. या छाननीत मोठ्या प्रमाणावर अर्ज अपात्र ठरले असून, लाखो अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
योजनेचा जून महिन्यात घेतलेल्या आढाव्यात अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गैरप्रकार प्रकरण अधोरेखित झाले आहे. लवकरच दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.