लोणारमध्ये पोलिसांची कारवाई शेतीसाठी उपयुक्त साहित्य व तारांचा साठा जप्त
एक लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत
बुलढाणा – जिल्ह्यात विविध भागांमध्ये शेतकरी बांधवांच्या शेतीसाठी उपयुक्त साहित्य तसेच तांबे आणि अॅल्युमिनियमच्या तारांच्या चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा गुन्ह्यांचा बारकाईने तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
दिनांक सात ऑगस्ट रोजी लोणार टाउन परिसरात एक व्यक्ती त्याच्या गोदामात अवैधरित्या आणि विनापरवाना शेतीसाठी उपयुक्त साहित्य साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी लोणार येथील संतोष पद्मचंद बोरा याच्या गोदामावर छापा टाकला.
या छाप्यामध्ये पोलिसांनी अंदाजे एक लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा खालील मुद्देमाल जप्त केला आहे
अखंड अॅल्युमिनियम तार पंचेचाळीस किलो
कट केलेली अॅल्युमिनियम तार पाचशे चौपट किलो
तांबे तार दहा किलो
अॅल्युमिनियम क्लेम पट्टी एकोणऐंशी किलो
स्प्रिंकलर निझेल अठ्ठेचाळीस किलो
या प्रकरणी संतोष बोरा याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशेचौवीस अंतर्गत लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईच्या माध्यमातून जिल्ह्यात यापूर्वी दाखल झालेल्या अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस विभागाकडून यापुढील तपास सुरू असून इतर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक कार्यरत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, सहाय्यक फौजदार राजकुमार राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन दराडे, दिनेश बकाले, एजाज खान, पोलीस नाईक युवराज राठोड, अमोल शेजोळ, विक्रांत इंगळे, राहूल बोर्ड आदींचा समावेश होता.