खामगाव : गाजी फाउंडेशन खामगावतर्फे स्थानिक सामान्य रुग्णालयात घटक मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने रुग्णालय अधीक्षक डॉ. नीलेश टापरे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, थॅलेसेमियाग्रस्त मुलांना तसेच इतर रुग्णांना रक्त व त्यातील घटकांची सुविधा खामगावमध्येच मिळावी. सध्या सामान्य रुग्णालयात ही सोय उपलब्ध नसल्याने रक्त घटक खाजगी रक्तपेढ्यांमधून किंवा अकोल्यातून आणावे लागतात, ज्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक ओझे वाढते.
फाउंडेशनने नमूद केले आहे की, जसे रक्त मोफत मिळते तसेच घटक यंत्राद्वारे होणाऱ्या उपचारांची सुविधा देखील सर्वसामान्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करून द्यावी. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.
विशेषतः थॅलेसेमियाग्रस्त मुलांना उपचारासाठी अकोला वा इतर ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे खामगाव सामान्य रुग्णालयात घटक मशीन उपलब्ध करून दिल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील, असे फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
निवेदन सादर करताना फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद अफजल खान, सचिव सुफियान बेग, कोषाध्यक्ष खान जफर खान, तसेच मोहम्मद रझा, सज्जाद फैसल यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
अध्यक्ष जावेद अफजल खान यांनी सांगितले की, हा जनहिताचा मुद्दा असून लवकरच याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनाही निवेदन दिले जाणार आहे. प्रशासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.