पुणे | २३ ऑगस्ट | Viral News LIve
आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज आयोजित आढावा बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय चौबे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त शीतल उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले की, ही स्पर्धा पुण्यात प्रथमच होत असून शासनासाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांनी दर १५ दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. सर्व यंत्रणांनी जबाबदारीने सहभाग नोंदवून गुणवत्ता पूर्ण काम केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात बेकायदेशीर होर्डिंग लावण्यास परवानगी देऊ नका, शहराचे विद्रूपीकरण खपवून घेतले जाणार नाही. अधिकृत जागी असलेल्या होर्डिंगवरच बॅनर लावावेत, याबाबत महापालिकेने दक्षता घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पुणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या हद्दीतील कामे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीत जिल्हा प्रशासन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रीडा विभाग, पीएमआरडीए आणि महानगरपालिका यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही आपापले सादरीकरण केले.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पर्धेची रूपरेषा मांडली. आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाच्या तयारीचा देखील आढावा घेतला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मिरवणुकीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि गणेशभक्तांसाठीच्या सोयीसुविधांबाबत माहिती दिली.