बुलडाणा : पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवार, २७ऑगस्ट रोजी अजान आणि नात स्पर्धेने जयंती उत्सवाची सुरूवात करण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून पैगंबर मोहम्मद साहेब यांची जयंती साजरी केली जात आहे. पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. येत्या ५ सप्टेंबर रोजी देशभरात पैगंबर मोहम्मद साहेब यांची जयंती
उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावर्षी मोहम्मद पैगंबर साहेबांची १५०० वी जयंती असल्याने त्याचे महत्त्व आहे. यावर्षी अल मदिना फाउंडेशनने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, रक्तदान शिबिर, नातीया मुशायरा, वृक्षारोपण शिबिरे आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी हाजी सय्यद उस्मान सय्यद मन्नू डोंगरे नगर परिषद शाळेत दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान आणि नात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उर्दू हायस्कूल, मौलाना आझाद शाळा, माउंट सेनाई शाळा, न.पा हाजी सय्यद उस्मान डोंगरे शाळेच्या विद्याथ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.