![]() |
श्रीमती कावेरीदेवी केदारमल अग्रवाल वरिष्ठ महाविद्यालय मध्ये एक विद्यार्थी एक तुळस अभियानाचे आयोजन |
मलकापूर प्रतिनिधी : श्रीमती कावेरीदेवी केदारमल अग्रवाल कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथे सांस्कृतिक विभागाच्या कडून "बहुगुणी तुळस”आणि "एक विद्यार्थी, एक तुळस” हा विशेष उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमासाठी तरुण भारत चे संपादक प्रा. डॉ. नितीन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप पाटील, आयक्यूएसी प्रमुख प्रा. डॉ. अलका जाधव तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. अनिल आरक हे मान्यवर मंचावर विराजमान होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. डॉ. नितीन भुजबळ यांनी तुळशीचे औषधी, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “तुळस केवळ पूजनीय झाड नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातील आरोग्य संवर्धनासाठी एक नैसर्गिक वरदान आहे. ‘एक विद्यार्थी, एक तुळस’ उपक्रमामुळे विद्यार्थी पर्यावरणाबाबत जबाबदार होतील आणि प्रत्येक घरापर्यंत हरितक्रांती पोहोचेल.”
यावेळी प्रा. आशिष हातळकर यांनीही तुळशीचे धार्मिक व आयुर्वेदिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी तुळशीमुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच मानसिक तणाव कमी होतो, हे उदाहरणांसह सांगितले.
या उपक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन सांस्कृतिक विभागाने केले. तुळशीच्या रोपांचे वाटप करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली, आरोग्याबद्दलची जाणीव आणि निसर्गसंवर्धनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.