मेहकर पोलिसांची धाडसी कारवाई – गुटखा माफीयाचा कंबरडा मोडला, 77 लाखांचा मुद्देमाल जप्त
मेहकर (दि. 21 ऑगस्ट 2025) –
मेहकर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत गुटखा माफीयाचा मोठा बुरखा उघड झाला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो अडवून तब्बल 77 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानुसार पहाटे 4 वाजता समृद्धी महामार्गावरील नागपूर-मुंबई वाहीनीवरील चॅनल क्रमांक 282 जवळ सापळा रचण्यात आला. त्यावेळी संशयित आयशर टेम्पो थांबवून तपासणी केली असता, गाडीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून 65 लाख 52 हजार रुपयांचा गुटखा आणि 12 लाख रुपयांचे आयशर वाहन, असा एकूण 77 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी एक आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, पोउपनि वसंत पवार, गणेश कड, संदीप मेधने, तसेच पोलीस अंमलदार आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी संयुक्तरीत्या केली