मुंबईत आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश
१२ आरोपी अटकेत, ६० कोटींहून अधिकची फसवणूक उघड
मुंबई प्रतिनिधि– सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई करत गुन्हे शाखा, कक्ष-२, गुन्हे प्रकटीकरण विभाग, मुंबईने आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश केला आहे. विविध बँकांचे खाते आणि मोबाईल सिमकार्ड अॅक्टिव्हेट करून देशभरात ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या या टोळीतील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे १२ ऑगस्ट रोजी कांदिवली (पूर्व) येथील डी.जी. सर्च कन्सल्टन्सी व प्रिरीत लॉजिस्टीक प्रा. लि. या बोगस कंपन्यांच्या कार्यालयांवर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी वैभव पटेल, सुनिलकुमार पासवान, अमनकुमार गौतम, खुशबु संदराजुळा व रितेश बांदेकर यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २५ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, २५ पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड, १०४ सिमकार्ड, प्रिंटर, स्वाईप मशीन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.
तपासात समोर आले की आरोपी बँक अकाऊंटची माहिती ७ ते ८ हजार रुपयांत विकत घेत होते आणि ती माहिती सायबर फसवणुकीसाठी वापरत होते. लॅपटॉपच्या तपासणीत एकूण ९४३ बँक खाते वापरले गेल्याचे, त्यापैकी १८१ खाती थेट सायबर फ्रॉडमध्ये वापरल्याचे उघड झाले.
सायबर नियंत्रण कक्षाच्या आकडेवारीनुसार या खात्यांशी संबंधित ३३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात मुंबईतील १६, महाराष्ट्रातील ४६ व इतर राज्यांतील २७७ तक्रारींचा समावेश आहे. आतापर्यंत नोंद झालेल्या फसवणुकीनुसार मुंबईत १.६७ कोटी, महाराष्ट्रात १०.५७ कोटी व देशभरातून एकूण ६०.८२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, खींद्र मांजरे, प्रशांत गावडे, कुलकर्णी, निंबाळकर, सावंत, राणे, आव्हाड, प्रियंका क्षिरसागर, पुजा क्षिरसागर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली.