![]() |
सजवलेल्या रथातून शिवलिंगाची रेणुका नगर मधून सुमारे 4 तास मिरवणूक काढण्यात आली. |
(अतिक खान) मुक्ताईनगर
लोकवर्गणीतून मंदिराची उभारणी, दिनांक 18/8/2025 ते 24/8/2025 शिवमहापुराण व दिनांक 25/8/2025 महाप्रसाद
मुक्ताईनगर शहरातील रेणुका नगर भागात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या शिवमंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला असून सोहळ्याच्या सहाव्या दिवशी सजवलेल्या रथातून शिवलिंगाची रस्त्याने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगरातील शेकडो महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेत शोभा वाढवली. जवळपास चार तास चाललेल्या या मिरवणुकीत ‘हर हर महादेव’चा जयघोष करण्यात आल्याने परिसर दुमदुमून गेला होता.
शनिवारी 23 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात होऊन प्रायचित पूजन, गणेश पूजन, मंडप पूजन व देवता पूजनाचा कार्यक्रम पार पडले. . त्या नंतर अग्नी पूजन, शांतिसूक्त, स्थापित देवता पूजन, हवन पूजन करण्यात येऊन सायंकाळी 3 वाजता मंदिरासमोरून शिवलिंगाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीसाठी ढोल ताशांचा वापर करण्यात आला मिरवणुकीत शेकडो महिला व शिवभक्तांनी सहभागी होत ‘बम बम भोले’च्या जयघोषात ठेका धरल्याचे दिसून आले. हातात भगवे ध्वज घेऊन नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. मंदिरासमोरून निघालेली मिरवणूक रेणुका नगर अष्टविनायक कॉलनी बस स्टॅन्ड चा काही भाग फिरून मिरवणुकीचा शिवमंदिरासमोर येऊन समारोप झाला. दुपारी 3 वाजता निघालेली मिरवणूक संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती शिवगीतांवर ठेका धरणारे तरुण, कलशधारी महिला व त्यांनतर सजवलेल्या रथात शिवलिंग ठेवण्यात आले होते. तसेच मिरवणुकीत करण्यात आलेल्या नृत्याने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिलांकडून घरासमोर सडा व पाणी मारून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी महिलांकडून शिवलिंगाचे पूजन व दर्शनासाठी गर्दी केली होती. ओम नम: शिवाय, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने शिवभक्तांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता मिरवणुकी मध्ये शहरातील सर्वच भागातील शिवभक्तांनी उपस्थिती लावली.
दिनांक 25/8/2025 काल्याचे किर्तन ह भ प रवींद्र हरणे महाराज यांचे झाले. सोमवारी सकाळी १० वाजेपासून बलिदान पुर्णाहुती पूजन होऊन ह भ प रामराव महाराज मेहुण मुक्ताई संस्था यांच्या हस्ते कलशारोहण व ध्वजारोहण तसेच श्री. अनिल माणिकराव पाटील यांच्या हस्ते शिवलिंगाची मंदिरात स्थापना करण्यात आली. या वेळेत संगीत प्रवचन, तसेच महाआरती व त्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवशक्ती महादेव महिला ग्रुप यांच्यासह महादेव भक्तांच्या व समस्त रेणुका नगर मधील रहिवाशांच्या वतीने करण्यात आले होते.