![]() |
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती |
छत्रपती संभाजीनगर, ( Aurangabad ) 29 ऑगस्ट 2025
दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला भेट दिली.
या कार्यक्रमात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र औरंगाबाद या नावाचे अधिकृतपणे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले. अनावरण समारंभाला राज्यसभा खासदार आणि माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपसंचालक मोनिका घुगे, सहाय्यक संचालक सुमेश तरोडेकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
फिट इंडिया चळवळीला चालना देण्यासाठी आणि समाजात तंदुरुस्तीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी देशातील अव्वल खेळाडू आणि क्रीडा शास्त्रज्ञांसह आयोजित फिटनेस सत्रात सहभाग घेतला. या सत्रात वॉर्मअप ड्रिल, स्ट्रेचिंग तंत्र, कोर स्ट्रेंथ व्यायाम आणि कंडिशनिंग प्रकारांचा समावेश होता. सर्व वयोगटातील नागरिकांना व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, हा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
खडसे यांनी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील खेळांच्या सुविधा, क्रीडा विज्ञान प्रयोगशाळा पाहिल्या आणि निवासी खेळाडू तसेच प्रशिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लठ्ठतामुक्त भारत या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करत फिटनेस ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यावश्यक बाब असून ती राष्ट्रीय विकासाचा आधारस्तंभ आहे, असे सांगितले.
कार्यक्रमात खेलो भारत नीती या परिवर्तनकारी धोरणावरही प्रकाश टाकण्यात आला. या धोरणाद्वारे तळागाळापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा संस्कृती विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. खडसे यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला क्रीडा क्षेत्राच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या कामगिरीचा आढावा यावेळी घेण्यात आला. या केंद्राने विविध खेळांमध्ये 87 पदके जिंकली असून गेल्या दोन वर्षांतच 32 आंतरराष्ट्रीय पदके मिळवली आहेत. येथे मुष्टियुद्ध, भारोत्तोलन, तलवारबाजी, धनुर्विद्या, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, पॅरा तिरंदाजी आणि पॅरा फेन्सिंग यांसारख्या खेळांमध्ये खेळाडू प्रशिक्षण घेतात. या सुविधेला ऑलिंपिक प्रशिक्षण केंद्र होण्याची क्षमता आहे, असे डॉ. भागवत कराड यांनी प्रशंसा करताना नमूद केले.
समारंभानंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी पुन्हा खेळाडूंशी संवाद साधत प्रशिक्षण व सुविधा पाहणी केली आणि पुढील काळात केंद्राच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
#NationalSportsDay #ChhatrapatiSambhajinagar #RakshataiKhadse #KheloIndia #FitIndia #SportsNews #Aurangabad #IndiaSports