अतिक खान | Viral news live
या प्रसंगी केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल श्री मनोज सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून तर मुख्यमंत्री श्री ओमर अब्दुल्ला सन्माननीय पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते. याशिवाय जम्मू-कश्मीर सरकारमधील क्रीडा मंत्री श्री सतीश शर्मा तसेच अनेक मान्यवर, अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
या जल क्रीडा महोत्सवात देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून तब्बल ५०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. रोइंग, कॅनोइंग, कायाकिंग या मुख्य जलक्रीडा स्पर्धा तर शिकारा स्प्रिंट, ड्रॅगन बोट रेस आणि वॉटर स्कीइंग या प्रात्यक्षिक खेळांमधून खेळाडू आपली क्षमता आजमावतील.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की,
"खेलो इंडिया" हा केवळ क्रीडा स्पर्धांचा उपक्रम नाही, तर देशातील युवाशक्तीला योग्य दिशा देणारा आणि भारताचे जागतिक स्तरावर क्रीडाक्षेत्रातील स्थान मजबूत करणारा एक राष्ट्रीय अभियान आहे. जलक्रीडा क्षेत्रात भारतातील खेळाडूंना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आपल्या भाषणात नमूद केले की,
"दल सरोवर ही फक्त पर्यटनाची ओळख नसून आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनत आहे. या स्पर्धांमुळे जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटन आणि क्रीडाक्षेत्राला एक नवा आयाम मिळेल."
त्याचबरोबर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की,
"जम्मू-कश्मीरमधील युवकांसाठी जलक्रीडेत प्रचंड क्षमता आहे. राज्य सरकार अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देईल आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देईल."
यावेळी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना असे सांगितले की,
"खेलो इंडिया – जल क्रीडा महोत्सव" हा भारतातील जलक्रीडेला जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून अनेक नवे चॅम्पियन्स देशाला मिळतील."
३ दिवस चालणाऱ्या या भव्य स्पर्धेत देशभरातून आलेले खेळाडू आपली ताकद, कौशल्य आणि तयारी दाखवणार आहेत. यामुळे केवळ जम्मू-कश्मीरचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे क्रीडा क्षेत्रातले स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
- रक्षा खडसे खेलो इंडिया