संग्रामपूर, 23 जुलै 2025
संग्रामपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अधिकारी कोमल रोडे यांच्या अरेरावीच्या वर्तनामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोरगरिबांशी आणि पत्रकारांशी दादागिरीचे प्रकार उघड झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद विधानसभा उपाध्यक्ष तथागत भाई आंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी तक्रार सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
अपमानजनक वर्तनाची मालिका
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राशन कार्डसंदर्भात कामकाजासाठी आलेल्या शेख नाझीम शेख नजीर (वरवट खंडेराव) आणि इतर गरजूंना अधिकारी रोडे यांनी अपमानास्पद बोलून कागदपत्रे उडवून दिली.
शेख नजीर शेख रफिक यांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला असता, अधिकारी रोडे यांनी उघडपणे धमकी देत सांगितले – “तुझं काम करत नाही, काय करायचं ते कर!”
महिला नागरिक शबाना सय्यद लुकमान यांच्यासोबतही उद्दामपणे वागण्यात आले.
पत्रकारांनाही धमक्या
घटनास्थळी सत्यशोधक न्यूजचे संपादक आणि दैनिक सेवा शक्तीचे उपसंपादक पोहचल्यावरही अधिकाऱ्यांनी “तुमच्यावर 353 आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन” अशा धमक्या दिल्या. या सर्व घटनांचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचे आंभोरे यांनी सांगितले.
चौकशीचे आश्वासन, पण अधिकारी अडून बसली
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र, अधिकारी कोमल रोडे यांनी “माझ्या दलनात कोणताही पत्रकार येऊ नये!” असा खुलासा करून प्रशासनाविषयीचा अवमानकारक दृष्टिकोन स्पष्ट केला.
आंभोरे यांची प्रमुख मागणी
कोमल रोडे यांच्यावर तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी.
गोरगरिबांवर आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याची प्रशासनाने लेखी ग्वाही द्यावी.
तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक आणि मूलभूत सुविधा द्याव्यात.
पुरवठा विभागाचे कामकाज पारदर्शक, शिस्तबद्ध आणि जनहितकेंद्रित व्हावे.
7 दिवसांत कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
गंभीर प्रश्नांची उभारणी
या प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे –
“सरकारी कार्यालयात साधा माणूस, गोरगरिब नागरिक आणि सत्य सांगणारा पत्रकार किती सुरक्षित आहे?”
लोकशाहीत अधिकारी हा जनतेचा सेवक असतो, अधिपती नव्हे. मात्र, संग्रामपूर पुरवठा विभागातील या प्रकरणाने अधिकाराचा दुरुपयोग आणि असंवेदनशीलता उघड केली आहे.
(Viral News Live साठी विशेष प्रतिनिधी)

