पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई मुक्ताईनगर तहसीलदारांची प्रभावी मोहीम; बुलढाणा जिल्ह्यातील चार डंपर जप्त

Viral news live
By -
0
पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई मुक्ताईनगर तहसीलदारांची प्रभावी मोहीम; बुलढाणा जिल्ह्यातील चार डंपर जप्त


(प्रतिनिधी : अतिक खान, मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार गिरीश वखारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक मोहिमेत बुलढाणा जिल्ह्यातील चार डंपर जप्त करण्यात आले असून, या कारवाईनंतर वाळूमाफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

तहसीलदार वखारे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) सकाळी महसूल पथकाने कुऱ्हा-मलकापूर रस्त्यावरील धुपेश्वरजवळील पुलाजवळ आणि पिंप्राळा शिवारात तपासणी केली. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. महसूल पथक दिसताच डंपर चालक वाहने सोडून पसार झाले.

महसूल विभागाने तत्काळ कारवाई करत चार डंपर ताब्यात घेतले. जप्त केलेली वाहने मलकापूर तालुक्यातील असल्याचे समजते. कारवाईदरम्यान परिसरात बघ्यांची व वाळू तस्करांची मोठी गर्दी जमली होती. महसूल अधिकारी पोकॉ सागर सावे, अंकुश बावस्कर, सुनील मोरे आणि मंगेश सुरळकर यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या कारवाईनंतर तहसीलदार गिरीश वखारे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “अवैध वाळू वाहतुकीवर सतत कारवाई करण्यात येईल. तसेच अशा वाहतुकीसाठी शेतातून रस्ता देणाऱ्या शेतकऱ्यांवर बोजा टाकण्यात येईल, आणि ज्या जमिनीवर आधीच बोजा आहे त्या सरकारजमा केल्या जातील.”

त्यांच्या या कडक भूमिकेमुळे वाळूमाफिया हादरले असून, या कारवाईचे स्थानिक जनतेतून स्वागत होत आहे. नागरिकांनी प्रशासनाला कुऱ्हा, थेरोळा, रिगाव, पिंप्राळा, कोहाळा, बोदवड आणि काकोडा गावांमधील अनधिकृत वाळू साठ्यांवर आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाळू तस्करीवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

थेरोळा शिवारात रात्रीच्या वेळी वाढलेल्या वाळू तस्करीमुळे शेतरस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. चालक बहुतेक अल्पवयीन व नशेत असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)