![]() |
मुक्ताईनगर शहर व तालुक्यात अवैध शस्त्रांचा सुळसुळाट...!प्रशासन गुन्हेगारांना पोसतेय का? असा सवाल जनतेतून |
मुक्ताईनगर (अतिक खान) :
मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध शस्त्रांचा वापर आणि साठा झपाट्याने वाढत असून, समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, या प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गावागावात काही टोळ्या हातात तलवारी, चाकू, कट्टे यांसारखी घातक शस्त्रे बाळगून फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सोशल मीडियावरदेखील काही युवक अशा शस्त्रांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे “अशा गुन्हेगारांना पोलिस प्रशासन मोकळे रान देत आहे का?” असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
अवैध शस्त्रांचा वापर वाढला तर गुन्हेगारीलाही खतपाणी मिळणार!
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अवैध शस्त्रे वापरणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा दहशत, खून, मारामाऱ्या अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोज रात्री काही टोळ्या मोकाट फिरतात, पण कारवाई मात्र होत नाही,” असे काही नागरिकांनी सांगितले.
शांततेसाठी धडक मोहीम राबवावी अशी मागणी
सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाला मागणी केली आहे की, अवैध शस्त्रसाठ्याविरुद्ध विशेष मोहिम हाती घेऊन अशा समाजविघातक घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मुक्ताईनगरमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जनतेची एकमुखी मागणी आहे.