अमडापूर व उदयनगर येथे सायबर जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
उदयनगर : ‘एकच लक्ष, महाराष्ट्र करूया सायबर गुन्हे मुक्त’ या बुलढाणा पोलीस दलाच्या उपक्रमांतर्गत आज मंगळवारी १४ ऑक्टोंबर रोजी अमडापूर व उदयनगर येथे सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उदयनगर चौफुलीवर पार पडलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करताना ऑनलाइन फसवणूक, बनावट कॉल, मेसेज व लिंकद्वारे होणाऱ्या आर्थिक चोऱ्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बँक खाते फ्रीझ झाल्याचे सांगून ओ टी पी मागणे आणि त्याद्वारे खाते रिकामे करणे, अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गर्दीच्या ठिकाणी खिसेकापूंपासून सावधगिरी बाळगण्याचाही संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात बुलढाणा सायबर सेलचे शुभम गवई, शैलेश बनसोड, रोहन झिने, निकिता मोरे, सांची इंगळे तसेच चालक पोलीस शिपाई कांचन बेलकर यांचा सहभाग होता. बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निखील निर्मळ, पो.हे.कॉ. दुर्गासिंह ठाकूर, पो.हे.कॉ. चंद्रशेखर मुरडकर तसेच इतर पोलीस कर्मचारी व होमगार्डचे सदस्यही उपस्थित होते. या कार्यक्रमात स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सायबर सुरक्षेबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला असून, अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सायबर फसवणुकीविषयी सजगता वाढीस लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. फसवणूक किंवा संशयास्पद कॉल/मेसेज आल्यास नागरिकांनी त्वरित १९३० व १९४५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.