भुसावळमध्ये राष्ट्र सेविका समितीच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती
(भुसावळ – अतिक खान)
‘हम करे राष्ट्र आराधन’ या विचारधारेवर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय महिला संघटना “राष्ट्र सेविका समिती” ला यंदा ८९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने देशभर व परदेशातील विविध शाखांमधून समाजउपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर भुसावळ शाखेतर्फे “शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम अहिल्यादेवी कन्या विद्यालय, जामनेर रोड, भुसावळ येथे पार पडला.
या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर विभाग बौद्धिक प्रमुख श्रीमती अनिताताई अनिल कुलकर्णी प्रमुख वक्त्या म्हणून सहभागी झाल्या व सेविका भगिनींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सेविका भगिनींचे आकर्षक पथसंचलन शहरात काढण्यात आले. शस्त्रपूजनाच्या विधीपूर्वक पार पडलेल्या या सोहळ्यात हिंदू संस्कृतीतील शौर्य, संघटन आणि आत्मविश्वास यांचे दर्शन घडले.
यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे म्हणाल्या की, “असुरी प्रवृत्तीवर विजय मिळवण्यासाठी आणि समाजात सद्वृत्तीचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. महिलांच्या आत्मविश्वास व शौर्य वृद्धीसाठी राष्ट्र सेविका समितीचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.”