![]() |
अखेर पत्रकार बांधवच बुजवणार भुसावळ रोडवरील खड्डा! एखादा मोठा अपघात होण्यापूर्वीच पत्रकारांचा पुढाकार — प्रशासनाचे डोळे कधी उघडणार? |
मुक्ताईनगर अतिक खान :
भुसावळ ते कोथळी रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एक मोठा खड्डा पडलेला असून, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होत आहे तसेच अपघाताची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अनेक स्थानिक पत्रकार बांधवांनी या विषयावर बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या संयमाचा अंत झाला आहे.
शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष पाहून अखेर पत्रकार बांधवांनी स्वतःच पुढाकार घेत जनहितासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्याचा उपक्रम :
मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५, रोजी सकाळी १० वाजता, भुसावळ रस्त्यावरील तो जीवघेणा खड्डा पत्रकार बांधव स्वतःच्या पुढाकाराने बुजवणार आहेत.
या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमात सर्व पत्रकार बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार हे केवळ जनतेचा आवाज बनतात असे नाही, तर या वेळेस त्यांनी फक्त आवाज उठविण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीचा धडा समाजासमोर ठेवला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की “पत्रकारांनी जे केले ते प्रशासनाचे कर्तव्य होते. तरी आता तरी प्रशासनाने जागे होऊन अशा समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात.”