गृहविभाग विरोधकांच्या गुप्तहेरगिरीत व्यस्त’ – संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

Viral news live
By -
0

गृहविभाग विरोधकांच्या गुप्तहेरगिरीत व्यस्त’ – संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

फलटण येथील महिला डॉक्टरीण आत्महत्या आणि मुंबईतील तरुणीच्या हत्येनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी म्हटले आहे की, गृहविभागाचे लक्ष कायदा व सुव्यवस्था राखण्यापेक्षा विरोधकांवर गुप्तहेरगिरी करण्याकडे आहे, ज्यामुळे राज्यातील गुन्हेगारी वाढत असून महिला स्वतःला असुरक्षित समजू लागल्या आहेत.

राऊत म्हणाले, “गृहविभागाचे काम अत्यंत असंवेदनशील पद्धतीने सुरू आहे. विभागाचे मुख्य काम विरोधकांची गुप्तहेरगिरी करणे, त्यांच्या फोनवर टॅप ठेवणे आणि पोलिसांना त्यांच्या मागे लावणे इतकेच राहिले आहे. जेव्हा पोलिस यंत्रणेला राजकीय वापरासाठी वापरले जाते, तेव्हा फलटण आणि मुंबईसारख्या दुर्दैवी घटना घडत राहतात.”

त्यांनी पुढे म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष गृहविभाग, कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेकडे अजिबात नाही. “राज्यात पोलिस आणि कायद्याचा धाक संपला आहे. सरकारचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. गृहविभाग नागवलेला अजगर झाल्यासारखा आहे,” असे ते म्हणाले.

फलटण घटनेबाबत राऊत यांनी सांगितले की, सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरीणने आत्महत्या केली आणि त्या घटनेला पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे. दुसरीकडे, मुंबईत एका तरुणीवर दिवसाढवळ्या चाकूने हल्ला करून तिची हत्या करण्यात आली, त्यानंतर आरोपीनेही आत्महत्या केली. “अशा घटना महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसू लागल्या आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की, “राज्यातील पोलिस महासंचालक एक महिला अधिकारी आहेत, तरीही महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत. जेव्हा इतरांचे सरकार होते, तेव्हा ह्याच महिला नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता स्वतःची सत्ता असूनही त्या शांत का आहेत?”

राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी निष्कर्ष काढताना म्हटले की, महाराष्ट्राचे वातावरण अत्यंत चिंताजनक झाले आहे. सरकार आता शासनासारखे काम करत नाही, प्रशासनावरचे नियंत्रण पूर्णपणे संपले आहे आणि गृहविभागाचा वापर केवळ राजकीय सूडासाठी केला जात आहे.


Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !