उदयनगर चौफुलीवर अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत; ग्रामस्थ आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा
चिखली : बाळापूर-वरवंड महामार्गावरील उदयनगर चौफुली येथे सुरू असलेल्या अवैध अतिक्रमणामुळे वाहतुकीला गंभीर अडथळे निर्माण होत असून, यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी १७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खामगाव येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
महामार्गाच्या कामादरम्यान एकदा अतिक्रमण हटवण्यात आले असले तरी काही स्थानिकांनी पुन्हा नाली ओलांडून काँक्रीट रस्त्यावर तारांचे कुंपण उभारले आहे. परिणामी, वळण घेणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो आहे. या चौफुलीवर बस थांबा असून विशेष म्हणजे, या मार्गावरून तलाठी कार्यालय, आठवडी बाजार, तसेच तोरणा गुरुकुल विद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल आणि श्री शहाजी राजे विद्यालयातील शेकडो विद्यार्थी रोज ये-जा करतात. त्यामुळे नेहमीच वर्दळ असते. अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांची व प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
निवेदनात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच अतिक्रमण कायम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना महिलांसाठी तसेच प्रवाशांसाठी शौचालयांची कोणतीही सोय नाही. दुभाजकाचे कामही अपूर्ण असून, विद्युतीकरणाचे कामही रखडले आहे. जुने विजेचे खांब रस्त्याच्या मध्यभागी उभे राहिल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.या समस्यांबाबत वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उदयनगर चौफुलीवर ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर
अक्रम खान, गुलाब खान, फैजल खान, याया खान आणि साहेब खान यांच्या स्वाक्षऱ्या आहे.