![]() |
भुसावळ ते खंडवा तिसरी व चौथी रेल्वेलाईन संपादनबाबत; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची रेल्वे बोर्ड चेअरमन यांच्यासह बैठक... |
(अतिक खान)मुक्ताईनगर
नवी दिल्ली रेल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन श्री.सतीश कुमारजी* यांची भेट घेऊन नविन *भुसावळ ते खंडवा* तिसरी व चौथी रेल्वे लाईनसाठी *गहूखेडा ते फेकरी* २२ कि.मी.जमिन संपादन बाबत संवाद साधून संबंधित बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या, यावेळी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
*भुसावळ ते खंडवा* तिसरी व चौथी रेल्वे लाईनसाठी प्राथमिक अधिसूचना 20A चे नोटिफिकेशन निघाले असून भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयाकडून *भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक, साकरी, मन्यारखेडा, जाडगाव, फुलगाव, अंजनसोंडे, कठोरा बुद्रुक व रावेर तालुक्यातील गहूखेडा* या नऊ गावातील शेत जमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.
सदर भागातील शेत जमीन आतापर्यंत रेल्वे लाईनसाठी चौथ्यांदा संपादन होत असून, संपादन झाल्यानंतर जमिनीचे अवमूल्यन होते अशा परिस्थितीत उर्वरित शेतजमीन ही अत्यंत सुपीक असल्याकारणाने शेतकऱ्यांचे उपजिवीकेचे एकमेव साधन जमिनीचे व शिवाराचे दोन तुकडे होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन शेतकरी बेरोजगार होत असल्याने शेतकऱ्यांचा भूमी संपादनास तीव्र विरोध आहे सदर संपादनात 68+21 संपूर्ण 89 हेक्टर जमीन संपादन होत असून एकूण 130 गट बाधित होत आहेत त्यात काही शेतकरी कायम भूमिहीन होणार आहेत सदर संपादनामध्ये 250 शेतकऱ्यांची जमीन संपादन होणार आहे.
सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध बघता आणि भूमी संपादन न होणेबाबत *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी *माननीय केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव* यांचे सोबत चर्चा करून *केंद्रीय रेल्वे बोर्ड चेअरमन श्री.सतीश कुमार जी* यांचे सोबत शेतकरी प्रतिनिधी आणि त्यांचे वकिल धीरेंद्र देशमुख यांचे उपस्थितीत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांचे भविष्यातील कधीही भरून न निघणारे नुकसान याबाबत माहिती दिली आणि भुसावळ ते खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन जमिन संपादनासाठी पर्यायी मार्ग सुचविले ज्यामध्ये शेतकऱ्यांची कोणतीही जमीन संपादन होणार नाही आणि रेल्वेच्याच मालकीच्या जमिनीवर सदर प्रकल्प पूर्ण होऊ शकेल. यावर सकारात्मक प्रतिसाद देत माननीय रेल्वे मंत्री श्री.अश्विनी वैष्णव जी यांनी सदर रेल्वे लाईनसाठी पुनर्संवेक्षण करणे बाबत आदेश दिले.
यावेळी सदर बैठकीस शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री.राजेंद्र साहेबराव चौधरी, श्री.के.पी.चौधरी सर, श्री.शिवाजीराव राजाराम पाटील, श्री.राजकुमार चौधरी, श्री.राहुल प्रकाश पाटील तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांचे वकील म्हणून श्री.धीरेंद्र प्रतापराव देशमुख हे उपस्थित होते.