पुणे | २३ ऑगस्ट | Viral News Live
संवाद, पुणे, वृद्धी रिअॅलिटी, पुणे महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.
कोथरूड येथील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय व ४७ मुलींच्या शाळेत शुक्रवारी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने गणेशमूर्ती साकारल्या. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्याचा महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा केल्यानंतर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची ही पहिलीच कार्यशाळा ठरली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, वृद्धी रिअॅलिटीचे प्रसाद पाटील, महापालिकेचे क्रीडा अधिकारी माणिक देवकर, अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा राजश्री जायभाये आणि सुप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर उपस्थित होते.
शिल्पकार विजय राऊत आणि विजय दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संयोजन मुख्याध्यापिका ज्योती मानकर, निकिता मोघे आणि केतकी महाजन यांनी केले. या उपक्रमाला वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत व प्रज्ञा सातारकर स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण करून पर्यावरण संवर्धनास चालना देणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. मान्यवरांच्या शुभेच्छांनंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि उत्साहात गणेशमूर्ती घडवल्या.