![]() |
नानासाहेब, तुमचा उद्योगविश्वातील आणि समाजकारणातील प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी |
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे. अफाट मेहनत व प्रयत्नाची पराकाष्ठा यावर १०० टक्के विश्वास असणाारे व्यक्तीमत्व म्हणजे श्री. ज्ञानदेव निनू पाटील उपाख्य नानासाहेब पाटील. आक्रमक होणे हि त्यांची प्रकृती नाही परंतू ठामपणा हा मात्र त्यांचा स्वभाव आहे. त्या ठामपणाला प्रसन्नतेची जोड आहे. प्रसन्न ठामपणा याचा संबध अंहेतेशी नसुन विचारांशी आहे. मराठी माणसाला उद्योग करता येत नाही असा सर्वसामान्यांचा समज. परंतू श्री. नानासाहेब पाटील यांनी यशस्वी उद्योगांची उभारणी आणी त्याला कष्टाची जोड व चांगल्या लोकांचा संपर्क याच्या जोरावर ते एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपास आले आहेत.
आज त्यांचा अमृतमहोत्सवी ७९ वा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन. त्यांचे यशाची यशोगाथा प्रत्येक मराठी माणसाला समजावी त्यातुन प्रत्येक मराठी माणसाने प्रेरणा घ्यावी ह्याकरिता हा लेख. श्री. नानासाहेब पाटील यांचा जन्म २८/०८/१९४६ ला विदर्भातील प्रवेशद्वार तांदुलवाडी ता. मलकापूर जि. बुलडाणा येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण मलकापूर मधील म्युनिसिपल हायस्कूल मध्ये झाले. ५वी ते ८ वी पर्यंतचे शिक्षण सरकारी शाळा मलकापूर मध्ये झाले. तसेच ९वी व १० वी चे शिक्षण आदर्श शाळा मलकापूर येथे झाले. ११वी ते इंटरसायन्स चे शिक्षण नागपूर हिसलाप कॉलेज नागपूर येथे झाले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता उद्योगामध्ये त्यांनी आपले करीअर करायचे ठरविले. १९६४ ला निनु आनंदा पाटील हे होलसेल किराणा दुकान मलकापूर कर्म व जन्मभुमी मलकापूर येथे सुरु केले.
थोड्याच वर्षात उद्योगाचा विस्तार करत त्यानी स्कॉटलॅड ग्वालीअर यांचे विकीमोपेड ह्यांची मिनी मोटारसायकल ची एजंसी घेतली. १९७० मध्ये होलसेल किराणा दुकान बंद करुन त्यांनी एस्कार्ट लिमीटेड चे ट्रॅक्टर फोर्ड, फार्मट्रॅक व एस्कार्ट ब्रॅडची एजंसी घेतली. तसेच कृषीकेंद्र फर्म सुध्दा स्थापन केले. यामध्ये त्यांचे बंधु अण्णासाहेब पाटील व बापुसाहेब पाटील यांचा मोलाचा सहभाग होता. १९७८ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडीया कृषी शाखा मलकापूर यांचे टॅक्ट्रर लोन मधून १०१ ट्रॅक्टर एका दिवशी वितरण केले. त्यावेळी बँकेचे मुंबई येथील मोठे अधिकारी व एस्कार्ट कंपनीचे फरिदाबादचे सर्व मोठे अधिकारी हजर होते. त्यावेळी ४०० ट्रॅक्टरची भव्य रॅली सुध्दा निघाली होती. तद्नंतर भव्य स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुध्दा घेण्यात आला होता.
उत्तरोत्तर व्यवसायामध्ये प्रगती होत गेली. अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ व मलकापुरसह पाच जिल्ह्यामध्ये काम सुरु केले. १९७६ मध्ये गजेंद्र फेब्रीकेशन ह्या नावानी ट्रॉली व पराग ब्रॅड ने ट्रॅक्टरचे शेतीउपयोगी अवजारे बनविने सुरु केले. जसजसी ट्रॅक्टरची मागणी वाढत गेली तसतशी ट्रॉली ची मागणी वाढत गेली. तेव्हा लकी ट्रॅक्टर, कौशिक ट्रॅक्टर, राधाकृष्ण ट्रक्टर ह्या नावाने फर्म सुरु केले.
ह्या सर्वांमध्ये एंकदरीत ३०० कर्मचारी कार्यरत होते. परत १९८४ मध्ये ४० कर्मचारी वर्गासह कृषी केंद्र इंपेरिअर हि फर्म सुरु केली. ह्या फर्म मध्ये सुध्दा राधाकृष्ण ह्या नावाने ट्रॉली फॅक्ट्री सुरु केली. ट्राली व स्पेअरपार्टसुध्दा ट्रक्टर ह्या फर्ममार्फत विकल्या जात होत्या. १९८२ मध्ये चांगली ट्रॅक्टरची विक्रीमुळे एस्कार्ट कंपनीमार्फत त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. १९९५ ला ५१ ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच फोरव्हीलर एका शुगर फॅक्ट्रीला एकाच दिवशी वितरीत केले.एस्कार्ट कंपनी फरीदाबाद येथे कंपनीमार्फत ५ वेळा एमबीए तसेच मॅनेजमेंट चे कोर्स केले. तसेच कंपनी मार्फत वेळोवेळी कार्यशाळा विदेशी तंत्रज्ञान ह्याकरिता विदेश दौरे केले. १९८६ मध्ये अकोला येथे राधाकृष्ण सिनेमागृह उभारला. तसेच १९९९ मध्ये नगर येथे इलाईट ट्रेडेक्स रिफायनरी प्रकल्प उभा केला.
वरील उद्योगामध्ये दैनंदिन आर्थिक व्यवहार मोठे होते. तसेच ३०० कर्मचारी वर्ग असल्यामुळे त्यांचे वेतन व अडीअडचणी ला मदत लागत असे. दुरदृष्टीचा विचार करुन नानासाहेबांनी राधाकृष्ण नागरी पतसंस्था सुरु केली. पुढे राधाकृष्ण पतसंस्थेचे लोकार्पण कले. आज ह्या बँकेचे ६० कोटीचे भांडवल ठेव आहे. ह्या बँकेचे स्थापनेपासून ते आजतागायत नानासाहेब अध्यक्ष आहेत. ह्या सर्व भरभराटीमागे आमची एकत्र कुटूंबाची मेहनत व त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे ते अभिमानाने सांगतात.
१९९२ पासून पुणे येथे बांधकाम व्यवसायात उतरत नामांकित डिएनव्ही कंपनी पुणे येथे सुरु केली. कंपनीचे कार्य प्रगतीपथावर आहे.
व्यवसायाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून भातृमंडळ अकोला मार्फत वेळोवेळी समाजासाठी मदत केली. १९९४ पासून २०१९ पर्यंत अकोला भातृमंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. ह्यामध्ये त्यांनी भातृमंडळाची इमारत बांधकाम व विस्तार केला. भातृमंडळ यवतमाळला सुध्दा नानासाहेबांचे भरघोस योगदार राहीले आहे. १९९६ ते २००५ पर्यंत लॉयन्स क्लब मार्फत सुध्दा त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. या कालावधीत दोन वर्ष ते लॉयन्स क्लबचे अध्यक्षसुध्दा राहिले आहेत.
शिक्षणाशिवाय प्रगती नाही समाजातील तळागाळातील वर्गाला शिक्षण तसेच उच्चशिक्षण भेटायला हवे ह्याकरीता शिक्षण क्षेत्रात आपणा काहि करता यावे ह्याकरिता नानासाहेबांनी लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे मार्फत शाळा महाविद्यालयाचे संचालन व विस्तार केला. २०१२ पासुन आजातगायत ते या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे. आजचा आपला युवकाला उद्योगात पुढेजायचे असेल तर कौशल्याधारीत, रोजगारक्षम शिक्षण मिळावे ह्याकरिता २०१० मध्ये पद्मश्री डॉ. वि.भि.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले. संस्थांतर्गत येणाऱ्या बालवाडी, प्रायमरी, हायस्कुल, नुतन इंग्लीश स्कुल, जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ६००० ते ७००० विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. तसेच 3५० कर्मचारी वर्गास रोजगार मिळाला आहे.
नानासाहेब यांना आध्यात्मिक आवड सुध्दा आहे. वेळोवेळी ते अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करतात. या मधुन लोकांना नामसंकिर्तन व हरीकथेचा लाभ मिळवून देतात. नानासाहेब पाटील यांनी आपले मातोश्री स्व. सुपडाबाई निनु पाटील यांचे वर्षीश्राध्दानिमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब महाराज सातारकर ह्यांचे किर्तनाचा लाभ २००० मध्ये मलकापूरकर यांना मिळवून दिला होता.