मुंबई | २३ ऑगस्ट
राज्यात महिला स्वावलंबनासाठी नवे मार्ग शोधले जात असून सरकारच्या विविध योजनांमुळे महिलांना सक्षमतेकडे वाटचाल करता येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत रक्षाबंधनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यभरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवल्या. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, महिलांच्या सहभागाशिवाय राज्याचा विकास शक्य नाही. त्यामुळे महिलांना आर्थिक व सामाजिक बळकटी देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांसाठी स्वावलंबनाचे नवे दरवाजे खुले झाले आहेत. त्याचप्रमाणे लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून मागील वर्षी तब्बल २५ लाख भगिनी लखपती बनल्या असून, या कामगिरीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. चालू वर्षात आणखी तितक्याच महिलांना लखपती बनविण्याचे लक्ष्य आहे, तसेच पुढील काळात एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा कालावधी संपुष्टात येणार नाही, येत्या पाच वर्षांत कोणतीही महिला योजना बंद होणार नाही, असे ठाम आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.