उदयनगर : मुंबईतील ऐतिहासिक फ्लोरा फाउंटनजवळील हुतात्मा स्मारकासमोर असलेल्या एका शिल्पावर आवरण घालण्याची मागणी आता अधिकृतपणे मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे पोहोचली आहे. बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश दत्ता भुतेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मागणी केली आहे.
त्यांच्या मते, हे शिल्प अर्ध-नग्न अवस्थेत असल्याने ते हुतात्म्यांच्या शौर्याचा अपमान करणारे आहे.दरम्यान बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश दत्ता भुतेकर, दुर्गेशसिंग पवार व शुभम करे यांनी ३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे हुतात्मा स्मारक समोर निदर्शने करून आणि ४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही मागणी पुढील कार्यवाहीसाठी सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पाठवली आहे.
निवेदनात स्पष्टपणे म्हटले होते की, "अर्ध-नग्न शिल्प हुतात्मा स्मारकाजवळ असल्याने संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांच्या स्मृतींचा आणि महाराष्ट्राच्या शौर्याचा अपमान होतो. त्यामुळे या शिल्पावर योग्य प्रकारे आवरण घालण्यात यावे."
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवेदांकर्त्यांना मिळालेल्या अधिकृत पत्रामुळे या मागणीला अधिकृतता मिळाली आहे. आता सांस्कृतिक कार्य विभाग यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मागणीमुळे राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली आहे.