'मिशन परिवर्तन' अंतर्गत बुलढाणा पोलीस दलाची व्यसनमुक्तीसाठी अभिनव मोहीम
उदयनगर : तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या धोक्यावर मात करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे 'मिशन परिवर्तन' अंतर्गत एक अनोखी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अमडापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातूनच तब्बल ७६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन व्यसनमुक्तीच्या लढाईत आपले योगदान दिले.
व्यसनाधीनता ही आजच्या तरुणाईला लागलेली कीड आहे. या गंभीर विषयावर समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेसाठी दोन गट ठेवण्यात आले होते: शालेय गट (इयत्ता ८ वी ते १२ वी) आणि महाविद्यालयीन गट.
स्पर्धकांसाठी 'व्यसनाधीनता तरुणाईला लागलेली कीड', 'नशामुक्त समाजासाठी उपाययोजना', 'व्यसनमुक्ती काळाची गरज', आणि 'नशामुक्त भारत' असे ज्वलंत विषय देण्यात आले होते. या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
पोलीस दलाने या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक बक्षिसे जाहीर केली होती.शालेय गट: प्रथम पारितोषिक ₹३,०००, द्वितीय ₹२,००० आणि तृतीय ₹१,००० रोख रकमेसह प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह (ट्रॉफी).
महाविद्यालयीन गट: प्रथम पारितोषिक ₹५,०००, द्वितीय ₹३,००० आणि तृतीय ₹१,००० रोख रकमेसह प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह (ट्रॉफी).
स्पर्धेतील विजेत्यांना स्वतः पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
'अमडापूर पोलिसांचे विशेष प्रयत्न;
या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अमडापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री. निखिल निर्मळ यांनी स्वतः जनजागृती करून यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शिवाजी सुरडकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी अमडापूर परिसरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना भेटी दिल्या. यामध्ये श्री शिवाजी हायस्कूल, श्री शहाजी राजे विद्यालय, सहकार विद्या मंदिर उदयनगर तसेच अमर विद्यालय अमडापूर, जि.प. माध्यमिक शाळा मंगरुळ नवघरे, श्री.शिवाजी विद्यालय ईसोली, पांडव विद्यालय कव्हळा, श्री.ज्ञानेश्वर विद्यालय पेठ, राजर्षी शाहू विद्यालय दहिगाव, श्री.शिवाजी विद्यालय शेलसुर, आश्रम शाळा किन्ही नाईक आणि जि.प.माध्य. शाळा वरखेड यांच्यासह इतर विद्यालयाचाही समावेश होता.
ठाणेदार निर्मळ व सुरडकर यांनी मुख्याध्यापक व प्राचार्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच शालेय गटातून ७६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, ही बाब अमडापूर पोलीस स्टेशनच्या कामाची पोचपावती आहे.
'पोलीस काका व पोलीस दिदी' उपक्रमाची यशस्वी पुनरावृत्ती,
यापूर्वीही अमडापूर पोलीस स्टेशनने 'पोलीस काका व पोलीस दिदी' सारखा अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण केली होती. 'मिशन परिवर्तन' अंतर्गतची ही निबंध स्पर्धा त्याच यशस्वी उपक्रमाची पुढील पायरी मानली जात आहे. समाजाच्या सहभागातून व्यसनमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पोलीस दलाचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.