![]() |
जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई – 81 लाखांचा मुद्देमाल जप्त |
बुलढाणा जिल्ह्यात अवैध आणि विनापरवाना गौण खनिज म्हणजेच रेती वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवून चार टिप्पर वाहने आणि रेतीसह एकूण 81 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व गौण खनिज अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध रेती वाहतूक पूर्णपणे रोखण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांनी स्वतंत्र पथके तयार करून संबंधित वाहनांचा शोध घेण्याचे निर्देश दिले.
या मोहिमेत पोलीस स्टेशन मलकापूर शहर हद्दीत ज्ञानेश्वर गणेश झांबरे याला अटक करून त्याच्या ताब्यातील टिप्पर आणि रेती मिळून 15 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण हद्दीत उमेश गजानन भोंगरे याच्या ताब्यातून टिप्पर व रेती असा 15 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत आरोपी रामदास भास्कर परिहार याच्या ताब्यातून 35 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि शुभम गजानन झाल्टे याच्याकडून 15 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
एकूण चार वाहनांसह 81 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जिल्ह्यातील अवैध रेती माफियांना चोख संदेश देण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईमागील मार्गदर्शन आणि पथकाची भूमिका
या धडक कारवाईत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आदेश, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा आणि अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या नेतृत्वाखाली PSI पंकज सपकाळे, ASI राजकुमार राजपूत, ओमप्रकाश सावळे, HC अनुप मेहेर, दिनेशकुमार बकाले, संजय भुजबळ, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिगंबर कपाटे, मपोहेकॉ वनिता शिंगणे, NPC युवराज राठोड, अरविंद बडगे, PC जयंत बोचे, गणेश वाघ, विक्रांत इंगळे, निलेश राजपूत, वैभव मगर, दिपक वायाळ, DHC समाधान टेकाळे आणि DPC राहूल बोर्डे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक व्यवसायाला मोठा धक्का बसला असून पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.