बुलढाणा – विठ्ठल-विठ्ठल, हरी ओम विठ्ठला… या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूलचा परिसर आज भक्तिमय झाला. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुखमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदी संतांच्या वेशभूषेत सहभाग घेत भक्ती, शिस्त व सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवले.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शिवसाई ज्ञानपीठने विद्यार्थ्यांसह वारकरी वेशातील भव्य पायी दिंडीचे आयोजन केले होते. नर्सरीपासून ते १० वीपर्यंतच्या सुमारे १,३०० विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर करत विठ्ठलनामाचा जयघोष करत रस्त्यांवरून फुगडी खेळत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
शाळेतील परिसर टाळ, मृदुंग, अभंग आणि संतांच्या गजराने दुमदुमला होता. कार्यक्रमासाठी क्रिडा शिक्षक सागर उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तीचे नियंत्रण भूषण कानडजे, ऋषिकेश टेकाळे, धनंजय उबरहंडे, श्रीराज पोफळे, विवेक भुसारी यांनी सांभाळले. चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले, ज्यासाठी अर्चना हिवाळे व सीमा बोदडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विठ्ठलाच्या वेशात ईश्वरी डुकरे, पार्थ मोहरकर, शौर्य हिवाळे हे लक्ष वेधून घेत होते. पालखी वाहण्याची जबाबदारी ओमकार वाघ आणि जीवक धुरंधर यांनी सांभाळली. पालखीमध्ये विराजमान विठ्ठल-रुखमाई अतिशय दिमाखात शोभून दिसत होते. सकाळपासून सुरू झालेल्या या दिंडीने तुळशी नगर ते एचडीएफसी चौक, चिंचोले चौक, राम नगर मार्गे परत शिवसाई ज्ञानपीठमध्ये समारोप केला.
या भक्तिपर्वासाठी पालकांचा मोठा सहभाग दिसून आला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी पालखीचे स्वागत करून 'विठ्ठल नामाचा जयघोष' केला. शिवसाई शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी प्रसादाचे वाटप केले.
समारोप प्रसंगी शिवसाई परिवाराचे सर्वेसर्वा डी.एस. लहाने, संचालिका सौ. मीनाताई लहाने यांनी उपस्थित राहून एकादशीचे महत्त्व सांगितले व "भक्त पुंडलिकासारखे आई-वडिलांची सेवा करा" असा संदेश दिला. प्राचार्य प्रमोद मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश देत सामूहिक कार्याचे महत्त्व समजावले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक डी.बी. मोहरकर, पुष्पा गायकवाड, अपेक्षा मुळे, भागवत उबरहंडे, अश्विनी बंगाळे आणि संपूर्ण शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान राहिले. विद्यार्थ्यांना लाडू व प्रसाद देऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

