बुलडाणा | Viral News Live
बुलडाणा शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी लाखो रुपयांचे सिग्नल बसवण्यात आले, पण त्याचा प्रत्यक्षात उपयोगच होत नाही. नागरिक सिग्नल तोडत असतानाही ट्राफिक पोलिस मूकदर्शक बनून उभे असतात. त्यामुळे सिग्नलचा खरा उपयोग होत नसेल तर ते हटवावेत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
शहराध्यक्ष मंगेश बिडवे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट सांगण्यात आले की, शहरात मागील तीन महिन्यांपासून सिग्नल बसवले गेले आहेत. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही चौकात सिग्नलचे पालन होत नाही. वाहनचालक सिग्नल तोडतात आणि ड्युटीवर असलेले पोलिस बघ्याची भूमिका घेतात.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, हे सिग्नल फक्त व्हीआयपी वाहनांसाठीच कार्यरत आहेत का, असा संशय निर्माण झाला आहे. कारण, केवळ जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी जात असतील तेव्हाच पोलिस सक्रिय दिसतात. बाकी वेळेस मात्र वाहनचालक नियम तोडत राहतात.
शाळा- कॉलेज सुरु झाल्याने सिग्नलचे पालन अत्यावश्यक आहे. वाहनचालकांना नियमांची माहिती देणे ही ट्राफिक पोलिसांची जबाबदारी आहे. पण पोलिस निष्क्रिय राहिल्यास हे सिग्नल बसवून शासकीय निधीचा अपव्ययच होतो.
या सिग्नल योजनेमागे पुन्हा एकदा ठेकेदारांना आर्थिक लाभ देण्याचा डाव असल्याचा संशयही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. यापुढे जर सिग्नलचा उपयोग होत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सिग्नल हटाव आंदोलन छेडणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर शहराध्यक्ष मंगेश बिडवे, सत्तार कुरेशी, महेश देवरे, मनिष बोरकर, सुजित देशमुख, दिपक गायकवाड, अनिल बावस्कर यांची स्वाक्षरी आहे.

