५ फूट लांब कोब्राला जीवदान! जळगाव जामोदमध्ये सर्पमित्रांनी दाखवली माणुसकी
प्रतिनिधी, जळगाव जामोद:(अमिनोद्दीन काझी)
जळगाव जामोद येथील गोविंदपुरा परिसरात काल (१ नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास एका घरात भलामोठा विषारी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, तातडीने धाव घेतलेल्या दोन सर्पमित्रांनी या ५ फूट लांब कोब्रा जातीच्या सापाला सुखरूप पकडून मध्यरात्रीच जंगलात सोडून देत त्याला जीवदान दिले. या कृतीमुळे परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रांचे आभार मानले आहे.
गोविंदपुरा येथील रहिवासी सौरभ तायडे यांच्या घरात १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास हा ५ फूट लांबीचा नाग (कोब्रा) जातीचा साप आढळून आला. अचानक घरात आलेल्या या विषारी सापाला पाहून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सर्पमित्रांची तत्परता
सौरभ तायडे यांनी तात्काळ स्थानिक सर्पमित्र अभिजित तायडे यांना बोलावले. अभिजित तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत सापाची पाहणी केली असता, तो ५ फुटांचा विषारी नाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच अनुभवी सर्पमित्र शरद जाधव यांना मदतीसाठी बोलावून घेतले.
-भीती झाली दूर, नागरिकांनी मानले आभार-
सर्पमित्र शरद जाधव आणि अभिजित तायडे या दोघांनी मोठ्या शिताफीने व अत्यंत सुरक्षितपणे या सापाला पकडले. त्यांच्या या सहकार्यामुळे स्थानिकांच्या मनातील भीती दूर झाली आणि त्यांनी दोघांचेही आभार मानले.
मध्यरात्रीच केले अधिवासात मुक्त
सर्पमित्र शरद जाधव यांनी पकडलेल्या सापाला कुठेही न ठेवता, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडणे अधिक महत्त्वाचे मानले. त्यानुसार, त्यांनी रात्री १:३० वाजताच्या सुमारास तातडीने त्या सापाला सुरक्षितरित्या जंगलात नेऊन सोडून दिले. सर्पमित्रांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एक विषारी साप सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक जगात परतला.
