पुणे : आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घरची आणि दिवाळीच्या आनंदाची उणीव भासू नये, तसेच त्यांनाही दिवाळीचा उत्सवमय आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि विद्यार्थी वसतीगृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात आपल्या गावी जाणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांशी असणारे आपलेपणाचे नाते जपण्यासाठी, दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी मुलींचे वसतीगृह आणि मुलांचे वसतीगृह येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मा. प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, आणि मा. कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ देण्यात आला. कार्यक्रमाला अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, श्री. कृष्णा भंडलकर, वसतीगृह प्रमुख डॉ. सोनिया नगराळे, डॉ. परवीन तलत, विद्यार्थी विकास मंडळाच्या प्रभारी संचालक डॉ. सविता कुलकर्णी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी संचालक डॉ. गणेश भामे उपस्थित होते.
यावेळी मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमात एकूण 10 वसतीगृहांमधील सुमारे 600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून दिवाळी फराळाचा आनंद लुटला.