![]() |
मुक्ताईनगरात अवैध धंद्यांविरोधात मनसेकडून पोलीसांना निवेदन |
(अतिक खान) मुक्ताईनगर
मुक्ताईनगर शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचे जाळे वाढले असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेतर्फे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
हे निवेदन पोलीस निरीक्षक अडसूळ यांना देण्यात येणार असले तरी ते पोलीस सहाय्यक संतोष खवले यांना सुपूर्द करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शहर व ग्रामीण भागात दारू, गुटखा, सट्टा यांसारखे अवैध धंदे बेधडक सुरू आहेत. त्यामुळे तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळत असून, मारामाऱ्या, शिवीगाळ यांसारख्या घटना वाढल्या आहेत.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने कारवाई झाली नाही, तर मोठे आंदोलन उभारले जाईल. या वेळी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष विनोद पाटील, दिव्यांग सेना जिल्हा उपाध्यक्ष उत्तम जुमले, मनसे शहराध्यक्ष मंगेश कोळी, तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील तसेच चैतन्य भोई उपस्थित होते.
मधुकर भोई यांनी सांगितले की, "अवैध धंद्यांमुळे समाजाचे नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल."
या निवेदनामुळे मुक्ताईनगर पोलिस प्रशासनावर अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे