सातारा – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी राज्यातील तब्बल २७ जिल्ह्यांचा दौरा करून मागासवर्गीय समाजाच्या विविध समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यात त्यांनी नगरपंचायत व नगरपालिकांतील अनुसूचित जाती-जमातींच्या अनुकंपा नियुक्त्या तसेच इतर योजनांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले.
लोखंडे यांनी सांगितले की, समाज कल्याण विभाग मागासवर्गीय उमेदवारांचे प्रतिनिधित्व करत सातत्याने बैठका घेऊन ही प्रकरणे मार्गी लावत आहे. मुंबई कार्यालयात तक्रारींची गर्दी कमी करण्यासाठी आयोग स्वतः जिल्ह्यांमध्ये जाऊन तक्रारींचा निपटारा करत आहे, ही महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सातार्यात वाढत्या अॅट्रॉसिटी प्रकरणांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मागासवर्गीय वसाहतींवरील हल्ले किंवा भेदभावासारख्या घटनांमध्ये प्रशासनाने निष्पक्ष आणि तत्परतेने कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी मांडली. त्याचबरोबर अॅट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृतीसाठी समाज कल्याण विभागाने सक्रिय उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.
पश्चिम महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या बदलत्या परिस्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करताना केवळ औपचारिक कार्यक्रम नकोत, तर परिणामकारक उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे, असे मत नोंदवले.
लोखंडे यांनी स्पष्ट केले की आयोग नेहमीच मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांसाठी तत्पर आणि सक्रिय राहील. त्यांच्या २७ जिल्ह्यांच्या दौऱ्यामुळे आयोगाच्या कार्याला नवी गती मिळाली असून, समाजाच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरत आहे.