जळगाव, ता. 31 जुलै – जगभरात आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीसाठी, सामाजिक बांधिलकीसाठी आणि मानवतेच्या कार्यासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध धार्मिक नेते मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुफ्ती हारून नदवी हे केवळ एक धर्मगुरू नसून, शिक्षण, सामाजिक समरसता, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी देशभरात सक्रिय असलेले एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या व्याख्यानांना हजारो लोकांची उपस्थिती लाभते आणि ते लाखो तरुणांचे प्रेरणास्थान ठरले आहेत.
प्राध्यापक म्हणून त्यांनी इकरा मेडिकल कॉलेजमध्ये १५ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर काँग्रेस पक्षात आपली विशिष्ट ओळख निर्माण केली.
सुरुवातीला त्यांना जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैलीची आणि जनसंपर्काची दखल घेत आता काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रदेश सरचिटणीस म्हणून नेमणूक दिली आहे.
या नियुक्तीची माहिती मिळताच विशेषतः अल्पसंख्याक समाजात आनंदाची लाट उसळली असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांच्यासह जळगाव काँग्रेस कमिटीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.
या वेळी प्रतिक्रिया देताना मुफ्ती साहेब म्हणाले,
"मी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे विशेष आभार मानतो. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि रमेश चेन्नीथला यांचे मन:पूर्वक आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही जबाबदारी सोपवली. मी पक्षाच्या ध्येय-धोरणांचा प्रसार करीत, निष्ठेने व प्रामाणिकपणे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन."