![]() |
बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांवरील सुनावणी ठरली |
बुलढाणा, दि. 9 (जिमाका) — जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना 13 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची संधी आहे. यानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालयांमध्ये सुनावणी आयोजित करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाने दिली आहे.
जिल्हा नगरविकास प्रशासनाने सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले असून, सुनावण्या 16 व 17 ऑक्टोबर रोजी पार पडतील. त्यानुसार, 16 ऑक्टोबर रोजी बुलढाणा, सिंदखेड राजा, मेहकर, शेगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर या नगरपरिषदेतील प्राप्त हरकती व सुचनांवर सकाळी 11 वाजेपासून सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. तसेच, 17 ऑक्टोबर रोजी चिखली, लोणार, देऊळगाव राजा, खामगाव आणि नांदुरा या नगरपरिषदेतील प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणावरील प्राप्त हरकती व सुचनांवर सकाळी 11 वाजेपासून सुनावणी घेण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासन नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांचा योग्य विचार करेल आणि निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी सुनावणीत योग्य निर्णय घेईल. नागरिकांनी आपले अधिकार वेळेत वापरण्याची आणि हरकती व सूचना वेळेत दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.