संदीप जोगी... मुक्ताईनगर -----
प्रबोधिनी भागवत एकादशी व कार्तिकी वारी पंढरपूर निमित्त दि. ०२ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर (जि. जळगांव) येथील श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधीस्थळ मुळमंदिर येथे , मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिरात भक्तीचा महासागर उसळला. हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धा-भावाने आईसाहेब संत मुक्ताईंचे दर्शन घेतले.
जे भाविक कार्तिकी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, त्यांनी “संतांचे दर्शन म्हणजे देवाचे दर्शन” आणि “संतांची वारी म्हणजे देवाची वारी” या भावनेने श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे येऊन आईसाहेबांचे दर्शन घेत आपली कार्तिक वारी पूर्ण केली.
पहाटे श्रीकृष्ण हरि पाटील (कोथळी) यांच्या हस्ते आईसाहेब संत मुक्ताईंचा अभिषेक व महापूजा पार पडली. भाविकांसाठी श्रीकृष्ण हरि पाटील (कोथळी) व दिनकर महाजन (बंबाडा) यांच्या वतीने एकादशीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले.
दिवसभर नामस्मरण, अभंगगायन व भक्तीगीतांनी परिसर दुमदुमून गेला. भाविकांच्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते. संतपरंपरेचा आणि भक्तीचा संगम झालेल्या या प्रसंगाने श्रीक्षेत्र मुक्ताईनगर खऱ्या अर्थाने “लघुपंढरपूर” बनले.



